Nagpur Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : मध्य भारतातील सर्वात मोठ्या बाजारात पसरले घाणीचे साम्राज्य

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या कळमना मिरची बाजारातील अडते आणि व्यापाऱ्यांनी मिरची बाजारातील दुरवस्थेवर सभापतींचे लक्ष वेधण्यासाठी मार्केट बंद आंदोलन पुकारले होते. आंदोलनात 250 हून जास्त अडते व्यापारी सहभागी झाले होते. बाजाराच्या समस्या तातडीने न सोडविल्यास पुढील सोमवारी पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख आणि उपाध्यक्ष प्रकाश नागपुरे यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन बाजारात स्वच्छता आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या बाजाराच्या विकास कामांच्या फाइल्स पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनी मिरची व्यापाऱ्यांसोबत मार्केटची पाहणी करून चर्चा केली.

समस्या सोडविण्याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष

कळमना चिली मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राकेश वाधवानी म्हणाले, मिरची बाजारातील दुरवस्थेसाठी बाजाराचे व्यवस्थापन मंडळ जबाबदार आहे. दोन एकरातील हा बाजार आठवड्यात केवळ सोमवारी सुरु असतो. इतर दिवशी बंद असल्यामुळे स्वच्छता होत नाही. आता पावसामुळे पडून असलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. सांडपाण्याची पाइपलाइन बंद आहे. त्यामुळे हे पाणी रस्त्यावर वाहत आहे. ठिकठिकाणी रस्ते उखडले आहेत. अडते आणि व्यापायाला आपापल्या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागते. बाजारातील कचरा नियमित उचलावा आणि स्वच्छता ठेवावी, यासंदर्भात असोसिएशनने बाजार समितीला अनेकदा निवेदने दिली आहेत; पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. अखेर गडरचे घाण पाणी रस्त्यावर वाहू लागल्यानंतर व्यापर्यन्त आंदोलनाचे कठोर पाऊल उचलावे लागले. बाजार समितीच्या कार्यालयासमोरील अनेक महिन्यांपासून खराब झालेला रस्ता बाजार समिती बनवू शकली नाही, तर आमच्या बाजारात समिती स्वच्छता कशी करेल, असा सवाल वाधनानी यांनी उपस्थित केला आहे.

मध्य भारतातील सर्वांत मोठे मार्केट

कळमना चिली मार्केटमध्ये भारतातील सर्वांत मोठे आहे. येथून संपूर्ण देशात मिरची पाठविली जाते. वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होते. त्यातून समितीला मोठा महसूलही मिळतो. त्यानंतरही येथील स्वच्छतेकडे दुर्लक्षच केले जात असल्याचा आरोप वाधवानी यांनी केला आहे.