Nagpure Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : नागपुरातील रस्त्यावर उभ्या 'यमदूतां'ना हटविणार कोण?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : रस्त्यांवर उभे असलेले विद्युत खांब कोणी हटवायचे यासाठी अनेक वर्षांपासून नागपूर महानगर पालिका (Nagpur Municipal Corporation) आणि महावितरण कंपनी (Mahadiscom) यांच्यात भांडण सुरू आहे. खांब हटवायला लाखो रुपयांचा खर्च येतो, तो महापालिकेने द्यावा, अशी महावितरणची मागणी आहे.

आयआरडीपी योजनेतून नागपूर शहरातील रस्ते प्रशस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे एकेकाळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले खांब आता रस्त्यांच्या मधोमध आले आहेत. रस्त्यांच्या मधोमध आलेल्या या खांबांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. मध्यंतर राज्य सरकारने २० कोटी रुपये दिल्याने काही वर्दळीच्या मार्गांवरील खांब बाजूला करण्यात आले होते. मात्र शहराचा विस्तार जसा जसा होत चालला तशी तशी ही समस्या वाढतच चालली आहे.

पश्चिम नागपूरच्या टोकावर असलेले दाभा गाव आता शहरात आले आहे. तेथील लोकसंख्याही झपाट्‍याने वाढली आहे. त्यामुळे नगरसेवकाने वाडी ते दाभा हा जुना डांबरी रस्ता प्रशस्त केला. एवढेच नव्हे तर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले. मात्र त्यामुळे रस्त्याच्या मधोमध आलेले विद्युत खांब अडचणीचे ठरत आहेत. पाच - पंचवीस लोकांचे बळी गेल्याशिवाय हे खांब हटविले जाण्याची शक्यता नसल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.