Sambhajinagar Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुल ते एकता चौक मार्गावर अवतरली गटारगंगा!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका महत्त्वाचा असलेल्या विभागीय क्रीडा संकुल ते एकता चौक रस्त्यावरील गुरुचरण हरिकृपा काॅलनी, शंभुनगर येथील रहिवासी तसेच वाॅलमार्ट, युरोपीयन आठवडी बाजारातील ग्राहक तसेच पोतदार शाळेतील शेकडो विद्यार्थी, पादचारी व वाहनधारकांना या रस्त्यावर अवतरलेल्या गटारगंगेचा मोठा फटका बसला आहे.विशेष म्हणजे याच मार्गावर हाकेच्या अंतरावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे संपर्क कार्यालय आहे. यासंदर्भात गुरुचरण हरिकृपा सोसायटीतील नागरिकांनी महानगरपालिका वार्ड अभियंत्यांना मलनिःसारण वाहिनी दुरूस्ती संदर्भात तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या भागात गेल्या महिनाभरापासून तुंबलेल्या गटारीचे पाणी थेट रस्त्यांवरून वाहत असल्यामुळे रोगराई निर्माण होण्याची भीती आहे. शहरातील सुतगिरणी चौक ते शहानुरवाडी एकता चौक हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. वर्दळीच्या भागात गटारगंगा अवरल्याने त्याचा त्रास परिसरातील रहिवासी व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटारींची नियमित स्वच्छता होत नाही त्यामुळे गेल्या महिनाभरापासून परिसरात गटारीचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी सतत वाहत असल्याने परिसरात डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. गटारी चोकअप झाल्यावर त्यांची स्वच्छता करणे ऐवजी पालिकेचे कर्मचारी ठिकठिकाणी गटार उघडी करून पाणी रस्त्यावर काढत असल्याचे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.महानगरपालिकेत  प्रशासकीय राजवट असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. याबाबत पालिका मुख्यालयात तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.