river Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : 'या' नदीवरील पुलाचे बांधकाम कधी होणार पूर्ण? नागरिकांना होतोय त्रास

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : महागाव तालुक्यातील गुंज मोहदी रोडवरील शिप नदीवर होत असलेल्या पुलाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे त्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांचे हाल-बेहाल होत आहे. नागरिकांना त्रास होत असून सुद्धा  प्रशासन झोपेत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनीच कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.

जुना रपटा पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला असल्याने विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना व तसेच तालुक्याच्या ठिकाणी कामकाजासाठी जाणारे व रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी 25 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. अशी अवस्था असतानासुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दोन वर्षांपूर्वी गुंज ते मोहदी मार्गाचे डांबरीकरण माळेगावजवळील शिप नदीवर पूल बांधकाम मंजूर झाले. या कामाचे भूमिपूजन आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होऊन डांबरीकरण झाले. परंतु, शिप नदीवरील पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. मागील पावसाळ्यापूर्वी पुलाचे पिलरचे कामही पूर्ण झाले होते. पण, उर्वरित काम स्लॅब टाकून पूल पूर्णत्वास नेण्यास चालढकल होत आहे. 

पुलाच्या बाजूला असलेल्या रपट्यावरून जनता प्रवास करीत असते. पण, पुलाचे काम सुरू असल्याने रपटा मागील वर्षी पुरात वाहून गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली नसल्याने हा रपटा जीवघेणा ठरत आहे. तरी प्रशासनाला जाग आली नाही. माळेगाव येथे सातव्या वर्गापर्यंतच शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गुंज किंवा सवना येथील विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. तर नागरिकांना बँकेच्या कामासाठी, खत, बियाणे, किराणा व इतर कामांसाठी गुंज किंवा महागांव येथे जावे लागते. नदीवरील रस्ता बंद झाल्यामुळे 25 किमीचा वळसा घालून जावे लागत आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी येणारी बस नदीजवळ येऊन थांबते. पाल्यांना बसपर्यंत सोडण्यासाठी पालकांना नदी पार करून देण्यासाठी यावे लागते. पुलाचे काम लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी जिल्हा बँक संचालक प्रा. शिवाजी राठोड यांच्या नेतृत्वात माळेगाव येथील अमरसिंग राठोड, सरपंच पवन राठोड, माजी सरपंच अमोल चव्हाण, सुनील कराळे, विजय माटाळकर तथा इतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. तरी या पुलाचे काम कधी पूर्ण होते याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.