Wardha Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : वर्धा जिल्ह्यातील 'या' नदीवरील खचलेल्या पुलाचे काम होणार कधी?

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : देवळी तालुक्यातील दिघी येथील यशोदा नदीवरील पूल पूर्णत: जीर्णावस्थेत असल्याने दोन वर्षांपासून वाहतुकीस बंद करण्यात आला. तरीही यावरून वाहतूक सुरूच असताना रविवारी या पुलाचा एक भाग कोसळल्याने यावरून जाणाऱ्या तीन शेळ्या पंधरा फूट खोल खाईत पडल्या. शिवारातील शेतकऱ्यांनी धाव घेत या तिन्ही शेळ्या बाहेर काढल्या.

तीस वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल तीन वर्षांपासून नादुरुस्त ठरला आहे. या पुलाच्या गाळ्यामध्ये जागोजागी अंतर पडल्याने एक बाजू वाकली होती. त्यामुळे या पुलावरील वाहतूक दोन वर्षांपासून बंद करण्यात आली होती. या पुलाच्या दोन्ही बाजूने खंदक करून मार्ग अडविण्यात आला होता. तरीही दुचाकी आणि शेतकऱ्यांच्या बैलबंडीची वाहतूक सुरूच होती. जीर्णावस्थेत असलेल्या या पुलावर दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच वारंवार याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सुदैवाने आजचा अपघात शेळ्यावर निभवला. हा पूल नादुरुस्त असल्याने नदीपलीकडे असलेल्या दिघी, बोपापूर, चिखली तसेच इतर गावांतील शाळकरी विद्यार्थ्यांना पंधरा किमी अंतराचा फेरा घेऊन देवळी गाठावी लागत आहे. तसेच नदीपलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, या मागणीसाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले. परंतु गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील महाविकास आघाडी व महायुती या दोन पक्षांच्या सत्तासंघर्षात बांधकाम अडकले. श्रेय लाटण्याच्या भानगडीत लोकांना वेठीस धरण्यात आले. अखेर गेल्या दीड महिन्यांपूर्वी या पुलाच्या 5 बांधकामाला मंजुरी देऊन निविदा काढण्याचे सोपस्कार पूर्ण केले. परंतु भरपावसाळ्यात या पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्याने बांधकाम थांबले आहे.

टेंडर उरकले, लवकरच काम होणार

दिघीच्या यशोदा नदीच्या पुलाचा एक भाग कोसळल्याने या पुलाचे उर्वरित बांधकाम तोडण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जेसीबीच्या माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या पुलाच्या बांधकामाचे टेंडर झाले असून, येत्या काही दिवसात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे, असे देवळीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व्यास यांनी सांगितले.