Nagpur Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : ऐन पावसात रस्ता खोदला, वस्तीचा संपर्कच तोडला

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : सिवेज लाईनसाठी ऐन पावसात रस्ता खोदण्यात आला. त्यानंतर त्यात माती टाकण्यात आली. पावसामुळे माती आतमध्ये गेल्याने मोठी नाली तयार झाली असून घोगलीतील स्वामीधामपुढील वस्तीतून नागरिकांना बाहेर पडणे व बाहेरून घरी जाणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे पिपळी घोगली ग्रामपंचायतलाही याबाबत माहिती नसल्याने या वस्तीतील नागरिक वाहनांसह नालीत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरालाच लागून असलेल्या घोगली गावात सिवेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ऐन पावसात सिवेज लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला. त्यानंतर केवळ माती टाकून सोडून देण्यात आले. परिणामी माती आतमध्ये गेल्याने मोठी नाली तयारी झाली आहे. अनेकदा या मातीचा काही ठिकाणी अंदाज येत नसल्याने दुचाकी, चारचाकी या नालीत घसरून पडत आहे. स्वामीधाम पुढील वस्तीतील नागरिकांना वस्तीबाहेर निघणे कठीण झाले आहे. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी स्कूलबसही जाऊ शकत नाही. परिणामी मुलांना शाळेत जाता येत नाही. चाकरमान्यांचीही हिच स्थिती आहे. कंत्राटदाराने योग्य पद्धतीने भरण न केल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना स्वतःची वाहने इतर वस्तीत ठेवावी लागत आहे. पिवळा घोगली ग्रामपंचायतने हा रस्ता पूर्ववत करून द्यावा, अशी मागणी येथील नागरिक राम सेवटकर यांच्यासह इतर नागरिकांनी केली आहे.