नागपूर (Nagpur) : नियमित वेतन घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांच्या सोयी सुविधेविषयी काहीच देणेघेणे नसते. कामठी शहरातील नागरिकांच्या तहाण भागवण्यासाठी सुमारे पावणे सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. यास १० महिने उलटले तरी एक जलकुंभ बांधण्याचे कामही झाले नाही. त्यामुळे तीन जलकुंभ केव्हा बांधणार प्यायला पाणी केव्हा मिळणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कामठी तालुक्यात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन योजना अंतर्गत तीन पाण्याचे जलकुंभ व पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाकरिता पाच कोटी ७६ लाख ४३ हजार रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. नगर परिषदला निधीचा पहिला टप्पा प्राप्त होताच तीन ठिकाणी जलकुंभा बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र महिन्याभरातच अधिकारी व कंत्राटदाराचा उत्साह मावळला. काम थंडबस्त्यात टाकण्यात आले.
कंत्राटदार बांधकाम साहित्य घेऊन बाहेर पडला. त्यामुळे मागील दहा महिन्यांपासून जलकुंभाचा फक्त सांगाडा येथे उभा आहे. प्राप्त निधतून शहरातील कुंभारे कॉलोनी, नागसेन नगर व इस्माईलपुरा या तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजित आहे. त्यातून संपूर्ण शहराला २४ तास शुद्ध पाणी मिळेल असा दावा केला होता.