गडचिरोली (Gadchiroli) : जिल्हा सामान्य रुग्णालयातील इमारतीला पाणी गळती लागली आहे. वॉर्ड क्रमांक 8 व अन्य एका वॉर्डात पावसाचे पाणी गळत आहे. त्या ठिकाणी बेड रिकामे ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या वॉर्डात पाणी गळतीच्या पाण्यासाठी ट्रे ठेवल्याचे आढळले. शिवाय या रुग्णालयात डॉक्टरांची 20 पदे रिक्त असून वर्ग 3 च्या 100 वर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रतिनिधीने विविध विभागाला भेट दिली असता, सदर रुग्णालयाची सेवा अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याचे दिसून आले.
सदर रुग्णालयात बाह्य व आंतर विभागात आरोग्य सेवा दिली जाते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र व तालुकास्तरावरील ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व सोयी-सुविधा नसल्याने तेथील रुग्ण मोठ्या संख्येने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जातात. जिल्ह्याच्या रुग्ण सेवेचा भार या रुग्णालयावर असल्याने सरकारने येथील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरावी. जेणेकरून येथील आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत होईल. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही समस्या शासन दरबारी मांडण्याची गरज आहे.
छत पूर्ण ओलसर
जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 8 ला पावसाळ्यात पाणी गळती लागली आहे. इतर काही ठिकाणी पाणी गळती आहे. दरम्यान छत पूर्णतः ओलसर राहत असून येथे ठेवलेले रिकामे बेड व गाद्या खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गळतीच्या पाण्यासाठी 'ट्रे'
महिलांच्या वॉर्डामध्ये प्रवेश करताना मध्यंतरी पाणी गळती लागली आहे. त्यामुळे येथे पाणी पसरु नये, यासाठी ट्रे ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसाने इमारत गळत आहे. सदर इमारतीची पक्की दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सदर जिल्हा रुग्णालयाची इमारत जुनी असून इमारतीला 40 वर्षे पूर्ण होत आहेत. इमारतीच्या काही भागांची दुरुस्ती झाली असून इतर भागाची दुरुस्ती शिल्लक आहे. रिक्त पदांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या आवश्यक त्या सोयी- सुविधांकडे लक्ष पुरविले जात आहे. स्थानिक स्तरावरील समस्या मार्गी लावण्यात येतील, अशी माहिती या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
या वॉर्डात पाणी गळती
रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 8 या पुरुष वॉर्डातील छत पावसाच्या पाण्याने गळत असल्याने अर्ध्या भागातील बेड रिकामे दिसून आले. उर्वरित अर्ध्या भागात रुग्ण दाखल असून तेथे औषधोपचार सुरु आहेत. दरम्यान बाथरूम व शौचालयासाठी येथूनच रुग्ण व नातेवाइकांना जावे लागते. पाणी गळतीच्या पाण्याने फरशी ओली होत असते. दरम्यान ओलसर जागेवरून रुग्णांना जावे लागते. येथे पाय घसरुन पडण्याचा धोका आहे. काही दिवसांपूर्वीच सदर रुग्णालय इमारतीची डागडुजी करण्यात आली. मात्र, अल्पावधीतच पाणी गळती लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आंतर विभागाच्या पोर्चमध्येसुद्धा पाणी गळती आहे.