वर्धा (Wardha) : स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊन गेली तरीही अनेक गावखेड्यापर्यंत अद्यापही विकास पोहोचलाच नाही. परिणामी, आताही नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, न्याय मागण्याकरिता शासन प्रशासनाचे चार दशकांपासून उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यामुळे आता आर्वी तालुक्याच्या कासारखेडा येथील संतप्त गावकऱ्यांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्वी तालुक्याच्या कासारखेडा ग्रामपंचायत अंतर्गत दोन हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मजरा ते कासारखेडा व सावध ते हेटी या मार्गावर दोन मोठे नाले आहेत. या नाल्यावर पूल बांधलेले नसल्याने नागरिकांना आवागमनाकरिता अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या चार दशकांपासून या गावातील नागरिक या दोन्ही नाल्यावर पूल बांधण्याची मागणी आमदार, खासदार व तसेच जिल्हा प्रशासनाकडे करीत आहे. परंतु अद्यापही या नाल्यावरील पुलाचे बांधकाम झाले नाही.
वारंवार निवेदने देऊन लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरवेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आश्वासनाची खैरात वाटण्यात आली पण कामाकरिता अजूनही कुणीच पुढाकार घेतलेला नाही.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेचा ठरावही प्रशासनाला पाठविला तरीही कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.