नागपूर (Nagpur) : मानेवाडा रिंग रोड ते जंबुदीपनगर येथील नाल्याचे बांधकाम मागील १५ वर्षांपासून रखडले आहे. नाल्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे काम रखडले. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार जंबुदीपनगर सुधार समितीने पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण व त्याभोवती संरक्षण भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने ५ वर्षांपूर्वी १३ कोटी ५८ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, तो निधी तसाच पडला असून, नाल्याचे काम न झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याबाबत आयुक्तांकडेही निवेदन दिले. या कामात भ्रष्टाचाराची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समिती अध्यक्ष राजू रहाटे यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. याप्रकरणी चौकशी करून जंबुदीप नाल्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी या नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे नाल्याचे काम सुरू करण्याचे निर्देश महापालिकेला द्यावी, अशी मागणीही रहाटे यांच्यासह समितीचे सचिव श्याम बोडके, दीपक नागपुरे, नंदकिशोर बोराडे व हरीश नागपुरे यांच्या शिष्टमंडळाने केली.