तगादा : संभाजीनगरातील 'या' रस्त्यावरील भगदाडांना जबाबदार कोण?

Tagada
TagadaTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : हडकोतील जळगाव रोड आणि सर्व्हिस रस्तालगत एन - ११ महापालिका रुग्णालयाकडून टीव्हीसेंटर रोडवरील एसपीआयला जोडणाऱ्या व शेकडो गजबजलेल्या वसाहतींच्यामधून जाणारा एक किमी रस्त्यावरून प्रवास करताना जागोजागी पडलेल्या भगदाडांमुळे नागरिकांना प्रवास करायचा तरी कुठून, असा प्रश्न पडला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे भगदाडाचा अंदाज येत नसल्याने रस्त्यावरची ही भगदाडे अधिक धोकादायक ठरत आहेत.

Tagada
Nagpur : गणेश टेकडी उड्डाणपूल तोडणे सुरु;  त्या जागी होणार...

संपूर्ण चाळणी झालेल्या या रस्त्यावर अगणित भगदाडं पडल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यामुळे वाहन कडेलोट होण्याची स्थिती होऊन चालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. भगदाडांमुळे या रस्त्यावरून जाणारी वाहने धिम्या गतीने जात असताना वाहतुकीची कोंडी होते. यामुळे रस्त्याचे काॅंक्रिटीकरण तत्काळ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जळगाव रोड परिसरातील या रस्त्यावरून नवजीवन काॅलनी, शिक्षक हाउसिंग सोसायटी, पाथ्रीकरनगर, द्वारकानगर, दीपनगर, सुभाषचंद्र बोसनगर, मयुरनगर, सुदर्शननगर व अन्य शेकडो वसाहतीतील तसेच जळगावरोडकडून टीव्ही सेंटर, सिध्दार्थनगर व हडको एन १३ काॅर्नरकडे हजारो वाहने ये-जा करतात. दुचाकी, चारचाकी वाहनांसह जड वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. सकाळपासूनच वर्दळीचा ठरलेला रस्ता आजमितीला खड्डेमय नव्हेच तर भगदाडमय झाला आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडलेले आहे.

Tagada
Sambhajinagar: PWDची कामे करणाऱ्या बड्या ठेकेदारांचे आंदोलन,कारण..

यातच नेमक्या रुग्णालयाशेजारीच खड्डेमय रस्त्यावरून रुग्णांना तसेच वाहनांना हेलकावे खात व आदळत मार्ग काढावा लागतो. याच मार्गावर पुढे स्मशानभूमीकडे अंतयात्रा न्याव्या लागतात. दरम्यान अंतयात्रेकरुंना देखील मोठमोठ्या खड्ड्यातून वाट काढताना स्वर्गरथ मागे पुढे स्थिती सावरत वाट काढावी लागते. कंपन्या, शाळा बसेस, ट्रक आणि दुचाकी वाहने रस्त्यामुळे अडकून वाहतुकीची कोंडी होते.

दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झालेले आहेत. काही नागरिकांना नेहमीचा झालेला हा रस्ता आजच्या स्थितीत नकोसा झाला आहे. अशा रस्त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे बांधकाम खाते काॅंक्रिटीकरण अद्यापही करत नाही. रस्त्याचे काॅंक्रिटीकरण तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com