नागपूर (Nagpur) : रामटेक तालुक्यातील मनसर ते तिरोडा राष्ट्रीय महामार्गावरील शितलवाडी मौदा टी पॉईंट चौक हा काळजाचा ठोका वाढविणारा ठरतो आहे. रामटेक - मौदा हा मार्ग नागपूर-जबलपूर (एनएच-७) आणि नागपूर-रायपूर (एनएच-६) या दोन महत्त्वाच्या व मोठ्या राष्ट्रीय महार्गांना जोडला आहे. या मार्गालगत वीज प्रकल्प, सिमेंट उद्योग, साखर कारखाना यासह अन्य मोठे उद्योग आहेत. त्यामुळे या मार्गावर २४ तास ‘ओव्हरलोड’ वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र शितलवाडी मौदा टी पाईंट वळण धोकादायक बनले आहे.
या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यामुळे वळणावर वाहनचालक गोंधळात पडत आहेत. कुठून कसे जावे, हे कळेणासे झाले आहे. त्यातच हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो आहे. शितलवाडी ते मनसर महामार्गावर वाहिटोला रेल्वे क्रॉसिंगला, तसेच वळणाचे काम अपुरे असल्याने धुळीमुळे गावकरी व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात. येथे दिशा दर्शक फलक नसल्याने वाहन चालकांना अडचणीला सामोरे जावे लागते आहे.