नागपूर (Nagpur) : चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या... वयाच्या ६७ व्या वर्षी शरीर थकलेले... डोक्याला फेटा बांधून भर उन्हात बालाजीनगरातून स्मार्टकार्ड बनविण्यासाठी आनंदराव मोटघरे हे गणेशपेठचे एसटी स्टँड गाठतात. स्मार्टकार्ड काढण्यासाठी त्यांना एका भल्यामोठ्या रांगेत उभे राहावे लागते. कितीही त्रास होत असला तरी तो कोणाला सांगणार, असे आनंदराव सांगतात. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले अनेक जण येथे पहाटे ५ वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. ऑनलाईन सिस्टीमने अनेक अडचणी येत असून, एकाला किमान २० मिनिटे ते अर्धातास लागत आहे. या उकाड्यात ज्येष्ठांना रांगेत लावण्याचे MSRTCचे नियम त्रासदायक ठरत असल्याने ज्येष्ठांमध्ये नाराजी असल्याचेही आनंदराव सांगतात.
म्हातारपण कुणालाही नको असते. या वयात औषधांपासून इतर आजाराचा खर्च वाढतो. त्यामुळे किमान बाहेरगावी जाण्यासाठी जास्त पैसे लागू नयेत म्हणून ज्येष्ठ नागरिक राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन इच्छितात. मात्र, आता एसटीने सवलतीत बदल करून ‘स्मार्टकार्ड’योजना आणली. येत्या १ जुलैपासून हे ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे आता ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक प्रवासात ओळखपत्र दाखवून प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत घेऊ शकतात.
फक्त ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे स्मार्टकार्ड काढण्यासाठी सर्व ज्येष्ठांची तारांबळ सुरू आहे. पहाटे ५ वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक ‘स्मार्टकार्ड’ बनविण्यासाठी रांगेत लागत आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता पर्यंत केवळ ७० लोकांचाच नंबर लागल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.