मुंबई (Mumbai) : नवीन कल्याण शहराचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या आंबिवली, बल्याणी, मोहने आणि टिटवाळा परिसरातील अनेक रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. वर्षभर त्रास सहन करूनही कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन या वर्दळीच्या रस्त्याची देखभाल करत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. (Kalyan Dombiwali Municipal Corporation)
रिक्षा चालक, रहिवाशांनी महापालिकेने मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी केली नाही तर शहर अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. दीड वर्षापासून आंबिवली, बल्याणी भागातील नगरसेवक, रहिवासी पालिकेच्या शहर अभियंता विभाग, बांधकाम विभागाकडे दुरवस्था झालेल्या बल्याणी रस्त्याची दुरुस्ती करा म्हणून तगादा लावून आहेत. या महत्त्वपूर्ण रस्त्याकडे शहर अभियंत्यांनी वर्षभरात लक्ष न दिल्याने बल्याणी रस्त्याचा विषय रेंगाळला आहे.
प्रभागातील अभियंत्यांनी नादुरुस्त झालेल्या रस्ते कामाचे प्रस्ताव शहर अभियंता विभागाकडे पाठविले की ते तात्काळ मंजूर करण्याऐवजी लालफितीत ठेवण्याचे काम सुरू असल्याचे समजते. अनेक वेळा निधीचे कारण सांगून शहर अभियंता विभाग नस्ती मंजुरीची प्रक्रिया करत नसल्याचे सांगितले जाते.
आंबिवली-टिटवाळा भागातील हजारो रहिवासी दररोज कल्याण रेल्वे स्थानकात उतरून रिक्षा, खासगी वाहनाने आंबिवली, टिटवाळा, मोहने, बल्याणी परिसरात प्रवास करतात. बल्याणी येथील खराब रस्त्यामुळे अनेक वेळा रिक्षा चालक या रस्त्यावरुन प्रवासी भाडे घेऊन येण्यास तयार होत नाहीत. शहर अभियंता विभागाकडून बल्याणी रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील जागरुक नागरिक प्रवीण आंबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. शहर अभियंता यांच्या संथगती कामामुळे आम्हाला लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते, असे अभियंत्यांचे खासगीत म्हणणे आहे. महापालिकेत सध्या प्रशासक असल्याने त्याचा गैरफायदा शहर अभियंता विभाग घेत आहे, असे माजी नगरसेवकांनी सांगितले. महापालिकेत सत्ता स्थापन झाली की गेल्या तीन वर्षात शहर अभियंता विभागाने विकास आराखड्यातील किती रस्ते बांधले, नवीन रस्त्यांची बांधणी केली याविषयी आम्ही जाब विचारणार आहोत, असे ज्येष्ठ नगरसेवकाने सांगितले.
टिटवाळा-बल्याणी-आंबिवली रस्त्यासाठी नऊ ते १० कोटींचा निधी अपेक्षित आहे. पालिकेकडे निधी नसल्याने या रस्त्यावरील वैष्णोदेवी मंदिर ते आंबेडकर चौक या अर्ध्या रस्त्याचे काम हाती घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. हा अर्धवट रस्ता करून प्रशासन काय साध्य करणार आहे. या भागातील विकसकांकडून पालिकेने कोट्यवधी रुपयांचा विकास अधिभार वसूल केला आहे. तो पैसा कुठे गेला. तो पण कोविडच्या नावाने उधळला का, अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत.
बल्याणी रस्त्यावरील वैष्णौदेवी मंदिर-आंबेडकर चौक रस्त्याची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी नऊ कोटी निधी प्रस्तावित आहे.
- जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, कल्याण डोंबिवली महापालिका