तगादा : संभाजीनगरमधील रेणुका पूरम सोसायटीची अवस्था दयनीय; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा-देवळाईतील परिसरातील बहुतांश भागात ड्रेनेजच्या तक्रारी वाढल्या आहेत, एकीकडे सर्दी, ताप, खोकल्याने या भागातील खाजगी व सरकारी दवाखाने फुल झाले आहेत, दुसरीकडे शाळा-महाविद्यालये विद्यार्थांविना ओस पडू लागली आहेत. या भागात खुलेआम सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचऱ्याचे ढिग पडलेले आहेत. निदान पावसाळ्यात तरी मनपा प्रशासनाने काळजी घेणे बंधनकारक असताना दुर्लक्ष केले जात आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सातारा परिसरातील रेणुका पुरम सहकारी गृहनिर्माण सोसायटी ( संस्था ) फेज-१ / फेज-२  गट  नंबर १०४ येथील भर वसाहतीत खुल्या जागेत ड्रेनेज लाइन फुटल्याने घाण पाण्याचे तळे साचले आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : ऐतिहासिक मैदानावरील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम कागदावरच; अब्दुल सत्तारांच्या...

यासंदर्भात नागरिकांनी प्रभाग अभियंता आणि दस्तरखुद मनपा प्रशासकांना निवेदन देऊनही समंस्यांचे निराकरण होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोबतच या भागातील खुली मैदाने , रस्त्यांची कशी वाट लावली जात आहे, यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रेणुका पूरम सोसायटी बीड बायपास ते अहिल्याबाई होळकर चौक या मार्गावर वसलेली आहे.‌ डांबरी रस्त्यापासून ही एक ते दिड हजार नागरिकांची वसाहत रस्त्यापासून खाली उतारावर आहे, पावसाळ्यात रस्त्यावरचे सर्व पाणी उतारावरून वसाहतीत शिरते. अशा परिस्थितीत फॉरचून पार्क आणि ओम साई पॅराडाईज सोसायटी ही रेणुकामाता कमान ते म्हाडा कॉलनी रोड येथील ड्रेनेज लाइन फुटलेली आहे, या ठिकाणी भरपूर ड्रेनेज चे पाणी हे रेणुका पुरम सोसायटी लगत साचलेले आहे, सोबत कचरा ही फेकण्यात येतो या बाबत सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांनी प्रत्यक्ष जाऊन प्रभाग अभियंता व मनपा प्रशासकांना निवेदन देउन परिणाम शुन्य झाला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'या' मुख्य रस्त्याचे ऐन पावसाळ्यात काढले काम त्यामुळे नागरिक...

ड्रेनेज लाइनचे घाण पाणी रस्त्यावर सोडल्यामुळे १०६ घरांच्या रेणुका पूरम सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे, शाळकरी मुले, कुटुंबातील लहाण मुले, जेष्ठनागरिकांचे व या मार्गाचा वापर करणार्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही अद्याप ड्रेनेज लाईन दुरुस्ती केलेली नाही. सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी याबाबत मनपा आयुक्त, वार्ड अधिकारी यांना २२ जुन रोजी लेखी निवेदन लेखी दिले तरी कुणीही दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावरून मनपाचे सातारा - देवळाईतील पायाभुत सुविधांसाठी किती लक्ष आहे, हे रेणुकापुरमच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. 

काय म्हणतात नागरिक 

मनपा आयुक्त साहेब,  सातारा देवळाई परिसरातील नागरिक टॅक्स भरत नाहीत का ? सातारा देवळाई परिसरातील नागरिक रोज एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते का ? ड्रेनेज लाईन फुटल्याने व वसाहतीत तलाव साचल्याने डासांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे तरी फवारणी कर्मचारी येत नाहीत.

- स्मिता पटारे (पाटील) 

सातारा देवळाई परीसरात जीथे जीथे भूमिगत गटार योजनेंतर्गत अंकिता इंटरप्रायझेसकडून ड्रेनेज लाईनचे काम झाले तिथे तिथे चिखलमय प्रदेश तयार झाला आहे.येथे एकही रस्ता धड नाही. अहो "आभाळच फाटले आहे, तर ठिगळ कुठे कुठे लावनार " , अशी गत झाली आहे. स्मार्ट सिटी येऊनही आणि १३० कोटीचा कर भरूनही आमच्या नशीबी हालअपेष्टाच आहेत. आमच्या भागाचा मनपात केवळ मतपेट्या फुल करण्यासाठीच समावेश केला आहे.

- दत्तात्रय गुंजकर.

सातारा-देवळाई व बीड बायपास भागात सुरुवातीला रस्ते नव्हते.आता आमदार निधीतून रस्ते बर्यापैकी होत आहेत. परंतु कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने  ड्रेनेज लाईन व जलवाहिनी टाकुन रस्ते बांधकामाचे नियोजन करायला हवे. परंतु असे नियोजन केले जात नाही. याउलट आधी रस्त्यांचे बांधकाम केले जाते. त्यानंतर ड्रेनेज लाईन व पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते फोडले जातात. अशा अनागोंदी कारभारामुळे शासनाचे नव्हेच जनतेच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. याविरुद्ध जर कुणी आवाज उठवला तर जाऊद्याना होत आहेत रस्ते तर होऊद्या, असे म्हणत आवाज उठवणार्या सुजान नागरिका गप्प करतात. त्यामुळे आवाज उठवणार्यालाही शांत बसावं लागतं. सातारा - देवळाईत नेमकं तेच होत आहे. चार दिवसांपासून झालेले रस्ते खोदून ठेवलेले आहेत.मोठे मोठे खड्डे पडले आहेत. शाळेत जाणारी लेकरं पडतं आहेत. शाळेतील मुलांना घेऊन जाणारे रिक्षा , टू व्हीलर नीट चालवता येत नाही. अवघड परिस्थिती होऊन बसली आहे.

- बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा,देवळाई नागरि कृती समिती.

ज्या ठिकाणी आधी पाण्याची लाइन टाकली, त्या ठिकाणी नव्याने रस्ते केले, पण रस्ते तयार करताना नवी पाइपलाइन फोडली. रस्ता करायच्या आधी पाइपलाइन दुरुस्त करा, असे सांगुनही ठेकेदार ऐकत नाहीत. मुख्य रस्त्याचे बांधकाम केले जाते, पण त्याला जोडणारे रस्ते तसेच चिखलमय असतात. या रस्त्यांवरचा चिखल नवीन झालेल्या रस्त्यावर पसरतो. त्यामुळे नवा रस्ता देखील चिखलात रुतुन जातो.

- शिवराज कुलकर्णी 

नियोजन शून्य कारभाराचा उत्तम नमुना म्हणून सातारा - देवळाई व बीड बायपास परिसराकडे पाहुण लक्षात येतो. सरकारी कामे आणि त्यांच्या विविध तऱ्हा. जनतेच्या अडचणींना काहीच मर्यादा नाहीत.२५ वर्षांपासून प्यायला पाणी नाही, ड्रेनेज नाही,रस्ते नाहीत, नागरिकांनी मोठ्या हिंमतीने आणि कष्टाने वाचविलेल्या ओपन जागेचा विकास नाही.औषध फवारणीचा दूरदूरपर्यंत कुणालाच काही देणे घेणे नाही.एव्हढी मोठी जनता निव्वळ टँकरच्या पाण्याच्या भरवशावर आहे.

- डी. ओ. निकम

सातारा-देवळाई व बीड बायपास परिसरातील बहुतेक रेखांकनातील नियमानुसार सोडलेले ओपन स्पेस गायब झालेले आहे. यासाठी मनपा पथकाने उद्यानासाठी व मैदानासाठी आरक्षित भुखंड शोधणे गरजेचे आहे. 

- तात्यासाहेब चव्हाण, अध्यक्ष, राजेशनगर कृती समिती.

सातारा - देवळाई व बीड बायपास परिसरातील मुळ रेखांकनातील बहुतांश  सार्वजनिक भुखंडांवर शाळा, महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी बांधकाम केले आहे. सातारा - देवळाई व बीड बायपासचा नव्याने विकास आराखडा तयार करून या भागातील भुखंड माफीयांनी हडप केलेले भुखंड शोधुन ते परिसरातील रेखांकनधारकांना पुन्हा मिळवून देण्यासाठी मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांनी तसदी घेणे गरजेचे आहे.

- विनोद जाधव

सातारा परिसरातील सारा सिध्दीच्या रोडचे काम चांगले झाले आहे. नियोजनबद्ध पद्धतीने आधी पाणी लाईन झाली नंतर ड्रेनेज लाईन आणि नंतर रस्ता केल्याने कुठेही खोदले झाले नाही की खड्डा नाहीये ; पण बीड बायपासच्या रस्त्याबद्दल असे कुठेही दिसत नाही. सिमेंट रस्ता केला, पण त्यावर कसलेही नियोजन दिसत नाही. रस्ते.

- शंतनु पोळ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com