मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गासाठी रायगडमधील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत. 12 सप्टेंबर 23 रोजी कोलाड नाका येथे नेहमीप्रमाणे शांततेच्या मार्गाने आरती जागर आंदोलन होत आहे.
9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पत्रकारांनी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन केले होते. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 10 सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आणि एक लेन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कामाचा वेग लक्षात घेता हे काम गणपतीपूर्वी पूर्ण होत नाही. खड्डे भरण्याचे काम ज्या एजन्सीला दिले गेले होते ती एजन्सी बदलली जात आहे, तर जी मशिनरी सिमेंटचे काम करीत होती ती नादुरूस्त झाल्याने रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही असे दिसते.
रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाही तर गणेश भक्तांना प्रवास करणे शक्य होणार नाही. पेण - इंदापूर, लोणेरे - दासगाव या दरम्यान गाडी चालविणे अशक्य झालेले आहे. असे असतानाही राज्य सरकार गांभीर्याने या विषयाकडे पाहत नाही, याचा निषेध करण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी आरती जागर आणि खड्डयावरील गाण्याचा कलगीतुरा मुकाबला खड्ड्यात बसून केला जाणार आहे. या आंदोलनात पत्रकार आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होईल.