मुंबई : कर्करोगग्रस्तांसाठी महत्त्वाच्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील कामा रेडिएशन मशीन गेल्या महिनाभरापासून बंद आहे. थकबाकीमुळे संबंधित कंपनीने कामा रुग्णालयात सेवा देणे बंद केले आहे. मात्र त्याचा फटका कर्करोगग्रस्तांना बसत असून, त्यांची फरफट सुरू आहे. कामा रुग्णालयाची ही बेफिकीरी रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयानंतर कर्करोगग्रस्तांना दुसरा आशेचा किरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील कामा रुग्णालय; मात्र या रुग्णालयातील रेडिएशन मशीन गेल्या महिनाभरापासून बंद आहे. यामुळे रुग्णांना उपचाराअभावी माघारी फिरावे लागत असून, त्यांची फरपट सुरू आहे. पैसे थकल्याने संबंधित कंपनीने सेवा देणे बंद केल्याचे समजते. कर्करोगग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, ही बेफिकीरी रुग्णांच्या जीवाशी खेळली जात आहे.
राज्य सरकारचे 'कामा व आल्ब्लेस रुग्णालय' महिला विशेष रुग्णालय म्हणून प्रसिद्ध आहे. माफक दरात उपचार होत असल्याने राज्यभरातील महिला रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. प्रसूतिगृह यासह विविध गंभीर आजारांवर येथे उपचार केले जातात. महत्त्वाचे म्हणजे कर्करोगासाठी आवश्यक 'लिनियर अॅक्सिलेटर सी. टी. स्कॅन व सयंत्रे' म्हणजेच 'रेडिएशन' आणि 'केमो' थेरपीची व्यवस्था या रुग्णालयात आहे. टाटा कर्करोग रुग्णालयानंतर केवळ कामा रुग्णालयातच रुग्णांवर माफक दरात अत्याधुनिक उपचार केले जातात; परंतु कर्करोग रुग्णांसाठी वरदान ठरलेली रेडिएशन मशीन सेवा ४ एप्रिलपासून बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णांना इतक्या दूर येऊन उपचार न घेता परत फिरावे लागते.
सीएस सर्विक्स कर्करोग, गर्भपिशवी, मुखाचा, आतड्यांचा कर्करोग यांसारखे रुग्ण कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येतात. या रुग्णांना आधी रेडिएशन द्यावे लागते. त्यानंतरच केमो दिला जातो. मात्र रेडिएशन मशीन बंद असल्याने केमोसाठी येणाऱ्या रुग्णांनाही परत पाठवले जात आहे. रेडिएशन बंद असल्याने केमोदेखील देता येत नाही. अशा रुग्णांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
व्हेरियन कंपनीच्या माध्यमातून ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यांचे पाच कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे कंपनीने मशीन बंद ठेवल्याचे सांगितले जात आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या रुग्णालय प्रशासनाने कंपनीला सव्वा कोटी रुपये अदा केले. त्यानंतर काही दिवस सेवा सुरू झाली; मात्र पुढील थकीत पैसे न भरल्याने पुन्हा सेवा खंडित केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन, राज्य सरकार गंभीर आजारांच्या उपचाराबाबत फारसे गंभीर नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दिवसाला १०० हून अधिक रुग्ण
कामा रुग्णालयात 'व्हेरियन' कंपनीच्या माध्यमातून २०१४ मध्ये 'लिनियर अॅक्सिलेटर सी. टी. स्कॅन व सयंत्रे' सेवा सुरू करण्यात आली. सरकारने १७ कोटी रुपये खर्चून आवश्यक संयंत्र खरेदी केले. तेव्हापासून कर्करोगाने ग्रस्त महिला रुग्णांना माफक दरात सुविधा उपलब्ध झाली. दिवसाला साधारणतः १०० हून अधिक कर्करोगग्रस्त रेडिएशनसाठी रुग्णालयात येतात.
उपचारांना विलंब
अंबरनाथहून गेल्या १० दिवसांत रेडिएशनसाठी तीन वेळा आलो; मात्र मशीन बंद असल्याचे सांगितल्याने परत जावे लागले असे एका रुग्णाने सांगितले; तर मशीन कधी सुरू होईल माहित नाही; पण त्यामुळे उपचारांना उशीर होत असल्याचे शहापूरहून (जि. ठाणे) आलेल्या एका रुग्णाने सांगितले.
कंपनीचे थकीत देयके देणे सुरू आहे. आतापर्यंत सव्वा कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. सेवा बंद करण्याचा थकीत देयकांशी संबंध नसून मशीनमधील तांत्रिक समस्येमुळे सेवा बंद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या पथकाने मशीनची पाहणी केली असून आठवड्याभरात दुरुस्ती करून सेवा पूर्ववत केली जाईल.
- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय