नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत मागील महिन्यात कोदामेंढी येथील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरणाचे थातुरमातुर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम सुरू असताना त्यावर ताशेरे देखील ओढण्यात आले. याबाबत तांत्रिक अधिकारी कुश यादव यांच्या निदर्शनात देखील आणण्यात आले. पण फारशे गांभीर्याने घेतले नाही. सदर सीमेंट रस्ता आता चिखलाने माखला असून चार सहा महिन्यात तो उखडणार असे संकेत दिसू लागले आहेत. त्यामुळे सदर सीमेंट रस्त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे झाले असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी देखील होऊ लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या नागरी सुविधेअंतर्गत पंधरा लाखाच्या निधीत 55 मीटर लांब आणि सात मीटर रुंदीकरणाचे सिमेंटीकरणाचे बांधकाम करण्यात आले. थातुरमातुर खोदकाम करून 80 एमएम मेटलच्या ऐवजी 60 एमएम मेटल टाकण्यात आले. मेटल टाकल्यानंतर त्यावर रोलिंग करणे बंधनकारक असतांना ते केले नाही. मेटलवर (गीट्टी) मुरूम टाकून त्यावर पाणी मारून त्याचे कॉम्पेक्षण (मळणी) करणे तितकेच गरजेचे असतांना यापैकी काहीच आढळून आले नाही. म्हणजेच रस्त्याचा बेस (अंतर्गत भाग) मजबूत करण्यात आला नाही. रस्त्याचे दोन भागात बांधकाम करतांना आणि जॉइंड जोडतांना डोल बार (सळाखी) टाकणे अनिवार्य असतांना तेही टाकण्यात आल्या नाहीत. भर उन्हाळ्यात सीमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याने त्याची क्युरिंग होण्यासाठी पाणी मारणे गरजेचे असतांना उंदीर मूतेल या प्रमाणात पाणी टाकण्यात आले. त्यानंतर कुणीतरी कंत्राटदाराला रस्त्यावर तणीस टाकण्याची अक्कल सांगितली. पण तीही पूर्णपणे पाण्याने भिजत नसल्याने वाऱ्यामुळे ती तणीस लोकांच्या घरात आणि दुकानात उडू लागली. आता पावसाला सुरवात झाली त्यामुळे सीमेंट रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले.
येणारे-जाणारे हा सिमेंट रस्ता की पांदन रस्ता असेच बोलू लागले आहेत. पण कंत्राटदाराला सार्वजनिक हिताचे चांगले करण्याची सुडबुद्धी अध्याप सुचली नाही. बांधकाम सुरू असतांना रस्त्याला भेगा पडू लागल्या होत्या. बांधकामाच्या तांत्रिक बाबी आणि निकृष्ट दर्जाचे करण्यात येणारे बांधकाम याबाबत वारंवार तांत्रिक अधिकारी आणि कंत्राटदाराच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या. पण त्यांनी गांभीर्याने घेतले नाही म्हणजेच त्यांची मुजोरी समजावी. बांधकाम सुरू असतांना तांत्रिक अधिकाऱ्यानी ढुकुनही पाहिले नाही. पंचवीस वर्ष टिकणारा सीमेंट रस्त्याची चार सहा महिन्यात गुणवत्ता चव्हाट्यावर उघडी पडेल. त्यामुळे सदर रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून क्रॉस चेकिंग करणे गरजेचे आहे. सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासून घेणे हे तांत्रिक अधिकाऱ्याची जबाबदारी असते. त्यानंतर त्याची एमबी करून बिल काढणे गरजेचे असतांना त्सुनामीच्या लाटेप्रमाणे पंधरा दिवसात बिल काढण्यात आले. कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष न देता बिल तडकाफडकी काढून देणे म्हणजेच तांत्रिक अधिकारी कंत्राटदारावर किती मेहरबान आहेत हे यावरून दिसून येते. त्याचे संपूर्ण बिल काढले नाही. दहा टक्के निधी लोक वर्गणीतून ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येते. या संदर्भात पंचायत समिती मौदाचे बांधकाम विभाग अभियंता कुश यादव यांना विचारले असता त्यांनी सदर रस्त्याचे बांधकाम नागरी सुविधेअंतर्गत असल्याची माहिती दिली. सोबतच कंत्राटदाराला सांगून रस्ता साफ करण्याचे सांगितले.