तगादा : 35 वर्ष झाले तरी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत

Bhandara
BhandaraTendernama
Published on

भंडारा (Bhandara) : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत 245.5 मीटर पातळीवर धरणाच्या पाण्याने वेढलेल्या भंडारा जिल्ह्यातील गावांचे नवीन भूसंपादन व पुनर्वसन कायदा 2013 नुसार पुनर्वसन करण्यात यावे, पुनर्वसनातील बेजबाबदार कामकाजामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, या मुख्य व अन्य मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त हक्क कृती समितीच्या वतीने दसरा मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

Bhandara
Mumbai : 'त्या' 25 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

गोसेखुर्द धरण बांधकामाची सुरुवात 1988 रोजी झाली. गोसेखुर्द प्रकल्पावर आतापर्यंत 35 हजार कोटींचा खर्च झाला आहे. परंतु तरीही प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. गोसेखुर्द प्रकल्पासाठी भंडारा जिल्ह्यातील हजारो एकर शेतजमीन व शेकडो गावे पुनर्वसनात घेण्यात आली. शेतजमिनीचा मोबदला टप्प्याटप्याने देण्यात आला. परंतु, अधिकाऱ्यांनी कायदा व नियम धाब्यावर बसवून कमी मोबदला दिला. पुनर्वसनात नियमभंग केला. सर्व्हेसुद्धा चुकीचे केले. 10 जानेवारी 2022 ला पाण्याची पातळी 245.500 मीटर करण्यात आली. त्यावेळी आजूबाजूची शेतजमीन पातळीखाली बुडत आहे. परंतु,  गावांसंबंधी तांत्रिक मुद्दे समोर काढून पुनर्वसन टाळले जात आहे. यामुळे बुडीत क्षेत्रातील गावांत आरोग्य, शिक्षण व रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अधिकारी व प्रकल्पग्रस्तांना फायदे मिळू नये  म्हणून महसूल व वनविभागाचा 14 ऑक्टोबर 2022 चा शासन निर्णय लावून नुकसान करीत आहेत. परिणामी प्रकल्पग्रस्तांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे.

Bhandara
Nagpur : नागपूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा; काय आहे प्लॅन?

प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या :

गोसेखुर्द धरणाच्या पाण्याने वेढलेल्या गावाचे नवीन भूसंपादन व पुनर्वसन कायदा 2013 नुसार पुनर्वसन करण्यात यावे. अधिकाऱ्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. प्रत्येक कुटुंबाला नोकरी व रोजगार देण्यात यावा. प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्वरित वितरित करण्यात यावे. मागेल त्याला शेतजमीन देण्यात यावी. देऊ केलेली अनुदेय रक्कम वाढीसह व वाढीव कुटुंबासह प्रकल्पग्रस्तांना द्यावी. 1 जानेवारी 2014 नंतर झालेल्या निवड्यात नवीन कायद्याप्रमाणे मोबदला व पुनर्वसन हक्क देण्यात यावे. नागपूर येथे स्थानांतरित झालेले अधीक्षक व कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन कार्यालय, भंडारात द्यावे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com