मुंबई (Mumbai) : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने वाहनतळाच्या जागेवर इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांना आपली वाहने रस्त्यावर उभे करावी लागत आहेत. आता याच ठिकाणी सिडकोने 'पे अँड पार्क' सुरु केले आहे.
खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकासमोर वाहनतळ आणि बस टर्मिनल्ससाठी राखीव असलेल्या भूखंडावर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधून नागरिकांची फसवणूक केली आहे. या विरोधात आवाज उठवूनही हा प्रकल्प रेटून नेण्यात आला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्किंग करिता जागा राहिलेली नाही. सिडकोने त्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना आपली वाहने रस्त्यावरच पार्क करावी लागतात. मात्र तेथेही सिडकोकडून खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या बाहेर 'पे अँड पार्क' सुरू करुन वसुली सुरु केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात सुद्धा पार्किंगची जागा विकसित न करता पार्किंग शुल्क आकरले जात आहे. पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल असल्यामुळे मोटरसायकल घसरुन अपघात होत आहेत. तसेच नागरिकांना पार्किंग करत चिखलातून वाट तुडवत स्टेशनला जावे लागते. कामोठे कॉलनी फोरमच्यावतीने यासंदर्भात सिडको प्रशासनाला पत्र देऊन पार्किंगच्या नावावर सुरु असलेली वसुली बंद करण्याची मागणी केली आहे.