तगादा : 'या' रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या
मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शन स्थानकातून कोकणात जाणार्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवासी गेली अनेक वर्षे करत आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकात थांबा दिल्यास या भागात राहणार्या कोकणातील चाकरमान्यांची सोय होईल, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
दिवा स्थानकांत सध्या आठ प्लॅटफॉर्म असून, या स्थानकात दिवा-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या, दिवा-रोहा मेमू, दिवा-वसई अशा गाड्या चालविण्यात येतात. दिवा स्थानकात जर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना थांबा दिला तर दिवा, डोंबिवली व कल्याण, तसेच आजूबाजूच्या परिसरातील चाकरमान्यांचा ठाणे, कुर्ला, दादर, सीएसएमटी टर्मिनसवर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचला जाईल. परतीच्या प्रवासातही ठाण्याला उतरल्यानंतर पुन्हा सामानासह लोकल पकडणे अडचणीचे ठरत असल्याचे डोंबिवलीचे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.
दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने येथे 23 ते 24 डब्यांच्या गाड्या थांबविताना अडचण असते असे रेल्वे अधिकार्यांचे म्हणणे आहे. बहुतेक गाड्यांचे पारंपारिक आयसीएफ डबे हटवून त्यांना आधुनिक एलएचबी डब्यात रुपांतरित केले जात आहे. एलएचबी डब्यांची लांबी ही पारंपारिक डब्यांपेक्षा जरा जास्त असल्याने गाड्या उभ्या करताना अडचण येत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. तर दिवा स्थानकात चांगल्या सोयीसुविधा नसल्याने येथे गाड्यांना थांबा मिळत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दहा वर्षांपूर्वी दिवा स्थानकात पाच फलाट होते. कोकण मार्गे जाणार्या मेल-एक्स्प्रेस दिवा स्थानकातून विभागून कोकण रेल्वे मार्गावर नेण्यात येतात. आता आठ फलाट झाले. दिवा स्थानकांत प्रचंड मोठे जनआंदोलन झाल्यानंतर येथे फास्ट लोकलला थांबा देण्यात आला. दिवा स्थानकाच्या सर्वच फलाटांवर ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथे लवकर पाणी पुरवठा करावा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष सुजित लोंढे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.