यवतमाळ (Yavatmal) : जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे माहूर ते पुसद मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज या मार्गावर लहान मोठे अपघात नित्याची बाब झाली आहे. तरीही संबंधित विभागाकडून ही समस्या मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यातही हा प्रश्न गंभीर झाला होता, वर्षभरात यावर काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
यावर्षीच्या पहिल्याच पावसात वर्दळीच्या माहूर ते पुसद मार्गावर असलेल्या खड्यांचा पसारा वाढत गेला. खड्यांची खोली वाढत गेली. त्यात किती पाणी साचून आहे, याचा अंदाज येत नाही. त्यात वाहन आदळून अपघात होत आहेत, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे मांडला. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. येथील आरोग्य उपकेंद्र ते पैनगंगा नदीच्या पुलापर्यंत जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्धांमध्ये मातीमिश्रित मुरुम टाकण्यात आला. तिथेही चिखल तयार झाला आहे. याठिकाणी वाहने घसरून पडण्याची भीती आहे. पायदळ चालणाऱ्यांसाठी वाट कठीण झाली आहे. हा रस्ता पार करताना मोठ्या गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा रस्ता येतो. या विभागाकडून स्वतःहून पुढाकार घेऊन रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही उपाययोजना करण्यात येत नाही. या रस्त्यावरील खड्डयामुळे त्रस्त झालेल्या अनेकांना याचा अनुभव आला आहे. तक्रार केल्यानंतर केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात दुरुस्ती केली जात नाही. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना वेदना सहन कराव्या लागतात. शारीरिक त्रास होतो, वाहनाचेही नुकसान होत. असे असताना रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. संबंधित यंत्रणा उपाययोजना करीत नाही, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न मांडायचा तरी कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. चांगला रस्ता मिळविण्यासाठी धडपड माहूर ते धनोडा गावापर्यंत अनेक खड्डे पडलेले आहे. चारचाकी वाहनांनाही मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. चांगला रस्ता मिळावा यासाठी वाहनधारकांची धडपड सुरु असते. यासाठी सोबत सोबत चालत असलेल्या वाहनांच्या अगदी जवळून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकारात अपघात होण्याची भीती आहे.